• विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय 
  • आमदार अपात्रता याचिकाही फेटाळली 
  • शरद पवार गटाला धक्का 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर काही महिने याप्रकरणी सुनावणी झाली. नार्वेकर यांनी दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेले पुरावे, दस्तावेज तपासले. तसेच दोन्ही गटांमधील नेत्यांची उलटतपसाणी करून अखेर याप्रकरणाचा निकाल सुनावला आहे. नार्वेकर यांनी शरद पवार गटाने अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळल्या आहेत. तसेच अजित पवार गटातील आमदारांना पात्र ठरवले आहे.

राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. नार्वेकर निकाल वाचताना म्हणाले, अजित पवार यांच्या नेतृत्वातील गटाला विधानसभेच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. तर शरद पवार यांच्याबरोबर केवळ १२ आमदार आहेत. शरद पवार गटाने या दाव्याला कुठेही आव्हान दिलेले  नाही. त्यामुळे दोन्ही गटांचे संख्याबळ येथे  स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे पदाधिकारी आणि नेत्यांच्या मतांचा अधिक पाठिंबा आहे. यासंबंधी अजित पवार गटाने सादर केलेल्या दस्तावेजांना शरद पवार गटाने आव्हान दिलेले  नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधीमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, पक्षाची नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे.

  • पक्षाचा खरा अध्यक्ष कोण?

विधानसभेचे अध्यक्ष म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही. तर दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षाच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. तसेच पक्षाध्यक्षपदी आता जे आहेत, त्यांची निवड योग्य प्रक्रियेनुसार झाली नसल्याचाही दावा दोन्ही गटांनी केला होता. ३० जून २०२३ रोजी अजित पवारांना पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला होता. यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचे ३० जून रोजीच स्पष्ट झाले होते. अजित पवारांची निवडणूक पक्षघटनेच्या विरोधी आहे असा दावा शरद पवार गटाने केला आहे. पक्षाचा अध्यक्ष कोण आहे? हे मी ठरवू शकत नाही, अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी दिली.