• महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी 

बेळगाव  :  बेळगाव निपाणी भागातील बहुतांश दूध उत्पादक शेतकरी  गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाला) दूध पुरवठा करतात. पण अलीकडेच गोकुळ दूध संघाने सीमाभागातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गाई व म्हैशीच्या खरेदी दरात कपात केल्याने सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आधीच पशुखाद्य व वैरणीचे दर भरमसाठ वाढले असताना फक्त सीमाभागातील दूध दर कमी करणे हा सीमाभागातील शेतकऱ्यावर अन्याय असून या निर्णयामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.  

महाराष्ट्र शासन नेहमी सीमाभागातील जनतेला राज्याचा घटक समजते तशीच वागणूक देऊन कोल्हापूर प्रमाणे सीमाभागातील शेतकऱ्यांना सुद्धा खरेदी दर द्यावा अशी मागणी सीमाभागातील समस्त शेतकऱ्यांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

गोकुळ दूध संघाने दुधाचे दर पूर्ववत करावे यासाठी  कृषीमंत्री धनंजय मुंडे, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्री, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील तसेच गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदनपर पत्र पाठविण्यात आले आहे.