- युवा समिती पदाधिकारी आणि ग्रा. पं. सदस्यांची मागणी
खानापूर / प्रतिनिधी
हलशी बस स्थानक गेली कित्येक वर्षे भग्नावस्थेत असुन, सदर बस स्थानकासाठी खानापूर युवा समिती व ग्राम पंचायत सदस्यांनी, निधी मंजूर करून नूतनीकरण करण्याची मागणी केली आहे.
हलशी बस स्थानकाची दुरावस्था झालेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विकासाच्या प्रतीक्षेत हलशी बस स्थानक आहे, हलशी हे खानापूर तालुक्यातील मुख्य पर्यटन स्थळ आहे. पांडवकालीन नरसिंह मंदिर हलशी येथे असून दररोज शेकडो पर्यटक नरसिंह मंदिराला भेट देत असतात. आजूबाजूच्या वीस पंचवीस गावचा संपर्क हलशी गावाशी येतो. प्रायमरी व माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तसेच नंदगड खानापूर व बेळगावला जाण्यासाठी येथील बसस्थानकाचा वापर शेकडो नागरिक व विद्यार्थी करत असतात. बस स्थानकाची इमारत धोकादायक अवस्थेत असून प्रवाशासाठी उभारलेल्या बस स्थानकात सध्या भटकी कुत्री व जनावरे आढळून येतात. तीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तत्कालीन आमदार व्ही. वाय. चव्हाण व त्यावेळच्या मंत्र्याकडून या बस स्थानकाचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर या बस स्थानकाच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. बऱ्याचदा या बस स्थानकाचा प्रश्न सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न येथील कार्यकर्त्यांनी केलेला आहे.
आज या ठिकाणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण व युवा समितीच्या वतीने पाहणी करून तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन या बस स्थानकाचा प्रश्न सोडवण्यासाठी इमारतीला मोठा निधी द्यावा व प्रवाशासाठी बाकीच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे मत मांडून सरकार दरबारी या बसस्थानकाचा आवाज उठविला जाणार आहे, असे खानापूर युवा समितीचे पदाधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले.
यावेळी स्थानिक नेते राजू पाटील, अर्जुन देसाई, माजी तालुका पंचायत सदस्य संजय हलगेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग बावकर, सामाजिक कार्यकर्ते निंगाप्पा होसुर, दिनेश गुरव, सुभाष गुरव, प्रल्हाद कदम, ग्रामपंचायत सदस्य मुल्ला, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments