•  पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांचे उद्गार  

बेळगाव / प्रतिनिधी 

पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा उद्या दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्त पोलीस परेड मैदानावर आज बुधवारी त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, पी.व्ही. स्नेहा यांनी सहभाग घेऊन आयुक्तांचा सत्कार केला. यावेळी विविध पोलीस तुकड्यांनी शानदार पथसंचलन करून सिद्धरामप्पा यांना मानवंदना दिली.


पोलिसांकडून मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सर्वप्रथम पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले. सीमावर्ती बेळगाव जिल्ह्याचे पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण केले, त्यानंतर शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था राबवली, गणेशोत्सव, कन्नड राज्योत्सव, विधिमंडळ अधिवेशन यशस्वी केले. एमईएसला काळा दिवस साजरा करू दिला नाही. शहरातील अनेक समस्या, प्रकरणांवर तोडगा काढला. सर्वांच्या सहकार्याने जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली,असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावातील गणेशोत्सवासारख्या प्रसंगी १८ ते २० तास काम करावे लागते. तेव्हा पोलिस दलात काम करणाऱ्यांनी परिस्थितीनुसार धैर्याने काम करावे, असे ते म्हणाले. 

१९९९ मध्ये दुसऱ्या खात्यातून पोलीस विभागात आलो डीवायएसपी पदाची परीक्षा दिली. विजयपूर एसपी, रेल्वे विभागाचे एसपी म्हणून सेवा करून निवृत्तीच्या वेळी बेळगावला पोलिस आयुक्त म्हणून सेवा बजाविण्याची संधी मिळाली. परिपूर्ण पोलीस अधिकारी बनायचे असेल तर प्रशिक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, सीएआर एएसपी उमेश, सर्व एसीपी, डॉ. गिरीश सोनलवलकर, डॉ. सतीश नेर्ली व बेळगावचे नागरिक आदी उपस्थित होते.