- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
- कोल्हापूर येथे म. ए. समिती शिष्ठमंडळाने घेतली भेट
कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई उद्योगमंत्री उदय सामंत, भरत गोगावले , संजय राठोड , आ. राजेश क्षीरसागर आणि महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित होती.
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली अनेक वर्षे प्रलंबित असून ऑक्टोबरमध्ये याची सुनावणी झाली परंतु तीन न्यायाधीशांचे बेंच नसल्यामुळे हा दावा जानेवारी महिन्यात घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते. पण आजपर्यंत या दाव्याची सुनावणी सुरू झालेली नाही आपण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ वकील आणि इतर लोकांशी संपर्क करून दावा लवकरात लवकर कसा सुरु होईल, याकडे लक्ष द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यावेळी आपण निश्चितपणे यात लक्ष घालू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सीमाभागातील मराठी माणसाला दररोज सहन कराव्या लागणाऱ्या अन्याय संदर्भात यावेळी माहिती देण्यात आली. मराठी भाषा , संस्कृती आणि लिपी नष्ट करण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत आहे. याकडे महाराष्ट्राने लक्ष द्यावे आणि कर्नाटक सरकारला याबाबतीत जशास तसे उत्तर द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महाराष्ट्राच्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समिती यांच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावांची ताबडतोब अंमलबजावणी करावी, तसेच सीमाप्रश्नासंदर्भात नेमण्यात आलेल्या समन्वयकांना बेळगावात पाठवावे म्हणजे सीमाभागातील अनेक प्रश्नांची त्यांच्याबरोबर चर्चा होईल अशी विनंती यावेळी करण्यात आली. याबाबतीत आपण निश्चितपणे कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या बैठकीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, संजय राठोड, भरत गोगावले आणि राजेश क्षीरसागर हे उपस्थित होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळात समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे , तालुका चिटणीस एम. जी. पाटील, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष निरंजन देसाई, सरचिटणीसआबासाहेब दळवी, मध्यवर्ती समितीचे सदस्य विलासराव बेळगावकर, गोपाळराव पाटील, सुनील आनंदाचे व विनोद आंबेवाडीकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लवकरात लवकर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांबरोबर आपण एक बैठक आयोजित करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले
0 Comments