विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या सिंदगी गावातील एका होलसेल दुकानात झालेल्या चोरीच्या तपासात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३७ लाख रुपयांची रोख रक्कम, वाहतुकीसाठी वापरलेली कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजेंद्रकुमार मांगीलाल गुवाहाटी (वय २६, रा. मूळचा राजस्थान) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.विजयपूरचे जिल्हा पोलिसप्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी काल शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सिंदगी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले, गेल्या महिन्यात २४ डिसेंबर २०२३ रोजी सिंदगी येथील शांतेश्वर गुरुबसप्पा वराद यांच्या मालकीच्या सिगारेट विक्रीच्या दुकानातून सुमारे ४२ लाख रुपये किमतीच्या सिगारेटची चोरी करण्यात आली होती. याबाबत दुकान मालक राजेंद्र कुमार गुवाहाटी यांनी सिंदगी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारे विजयपूरचे अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख रामनगौडा हट्टी यांच्या नेतृत्वाखाली सिंदगीचे पोलिस निरीक्षक डी. हुलिवेप्पा, उपनिरीक्षक भिमाण्णा रबकवी यांच्यासह सहकाऱ्यांचे पथक तयार करून तपास करण्यात आला असता दि. ७ जानेवारी २०२४ रोजी आरोपी राजेंद्रकुमार मांगीलाल गुवाहाटी याला ताब्यात घेण्यात आले.या प्रकरणात सहभागी असलेले अन्य दोघेजण फरार झाल्याचे त्यांनी सांगितले. सदर कारवाई केलेल्या पोलिस पथकाचे जिल्हापोलिस प्रमुख ऋषिकेश सोनवणे यांनी अभिनंदन करून बक्षिस जाहीर केले आहे.
0 Comments