- चिक्कोडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई
चिक्कोडी / वार्ताहर
मांजरी (ता. चिक्कोडी) येथे राष्ट्रीय पक्षी असलेल्या तब्बल नऊ मोरांची हत्या केल्याप्रकरणी चिक्कोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका आरोपीला अटक केली आहे. मंजुनाथ पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो वीटभट्टीतील कामगार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, मांसासाठी विषारी पदार्थ खाऊ घालून मोरांची हत्या होत असल्याचा प्रकार मांजरी ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने कृष्णा नदीच्या पलीकडे दुचाकी उभी करून मोरांना मारण्यासाठी आलेल्या दोघांचा मांजरी ग्रामस्थांनी पाठलाग केला असता त्यांनी कृष्णा नदीत उडी मारून पोहत पळ काढला.
मांजरी ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत मोरांना ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. मांजरी ग्रामस्थांनी मोरांची हत्या झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे तपास करून शनिवारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला अटक केली. या प्रकरणातील अन्य एक आरोपी फरार असून वनविभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान याआधी मोरांचा मृत्यू झाल्याची माहिती देऊन देखील, वनाधिकाऱ्यांनी कोणतीही खबरदारी न घेता बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
0 Comments