बेळगाव / प्रतिनिधी

सीमाभागातील मराठी भाषिकांना आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने बेळगाव गोवावेस सर्कल येथील कॉमन सेवा सेंटरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे उभारलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या केंद्राला बेळगाव महापालिकेने नोटीस बजावली आहे. आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी या सेवाकेंद्राला टाळे ठोकले आणि सदर सेवाकेंद्र आठ दिवसांकरिता बंद ठेवण्याचा आदेश बजावला.

महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधीचा अर्ज आणि या योजनेबद्दल माहिती या केंद्रामध्ये दिली जात होती. त्यावर वक्रदृष्टी असलेल्या कन्नड संघटनांनी सेवा केंद्रावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या मागणीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सीमा भागातील तमाम मराठी भाषिकांतून संतापाची लाट उसळली आहे.