- हुबळीतील हिंदू कार्यकर्त्याच्या अटकेचा नोंदवला निषेध
- जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
देशातील जनता अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या उद्घाटनाची प्रतिक्षा करत असतानाच सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या काँग्रेस राज्य सरकारने हुबळीत ३१ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीतील गुन्हा उकरून काढत हिंदू कार्यकर्त्याला अटक केली आहे. या विरोधात बेळगावात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
तत्पूर्वी खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील चन्नम्मा चौक येथे जोरदार घोषणा देत राज्यातील काँग्रेस सरकारचा निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार मंगला अंगडी म्हणाल्या, ३१ वर्षांपूर्वीच्या प्रकरणाची चौकशी करत हिंदूंना अटक करून काँग्रेस सरकार हिंदूंवर अत्याचार करत आहे. देशातील तमाम जनता रामभक्त आहे. तेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी रामभक्तांवर केलेली कृती खरोखर निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपच्या महांतेश वकुंड यांनी ३१ वर्षांपूर्वी हुबळी येथील दंगलीचे प्रकरण उकरून काढणे योग्य नाही, अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटनावेळी हिंदू कार्यकर्त्यांना अटक करणे हे द्वेषाचे राजकारण आहे. भारतीय जनता पार्टी महानगर व ग्रामीण तसेच समस्त बेळगावकरांच्या वतीने आम्ही याचा निषेध करतो. देशाला अभिमान वाटत असताना सिद्धरामय्या यांच्या अशा प्रकारे वागणे निंदनीय असल्याचे ते म्हणाले.
तर बेळगाव ग्रामीण भाजपचे अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, हुबळी येथील खटल्यात सहभागी असलेले कार्यकर्ते निर्दोष असल्याचा आदेश न्यायालयाने दिला असतानाही, कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी असे द्वेषाचे राजकारण करून रामाला विरोध करण्याचे धोरण योग्य नाही. एका निष्ठावंत कार्यकर्त्याला अटक करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा सिद्धरामय्या यांनी त्या कार्यकर्त्याची सुटका करून हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात भाजप नेते मुरुगेंद्रगौडा पाटील, लीना टोपण्णावर, राजशेखर डोणी, सोनाली सरनोबत, दादागौडा बिरादर यांच्यासह भाजप नेते आणि महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
0 Comments