• बेळगाव तालुक्याच्या बसुर्ते गावातील घटना 

सुळगा (हिं.) / वार्ताहर 

अंगणवाडी मदतनीस महिलेला शिवीगाळ करून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. बसुर्ते (ता. बेळगाव) येथे ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सुगंधा मोरे (वय ५०) असे हल्ला झालेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, बसुर्ते येथील एका अंगणवाडीची मुले जवळच असलेल्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडत असल्याने संतप्त झालेल्या घरमालकाने अंगणवाडी मदतनीस सुगंधा मोरे हिला मारहाण केली. तर घराची मालकीण कल्याणी मोरे हिने विळ्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात नाकाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने सुगंधाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुलांनी अजाणतेपणी केलेल्या चुकीमुळे अंगणवाडी मदतनीस महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दि. १ जानेवारी रोजी अंगणवाडी केंद्र समोर घडलेली घटना उशिरा उघडकीस आली. याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.