- खानापूर तालुक्याच्या बेकवाड गावातील घटना
खानापूर / प्रतिनिधी
शेतवडीतील बोरवेल सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झाला. बेकवाड (ता. खानापूर) येथे बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ज्ञानेश्वर चांगप्पा माळवी (वय ३४ रा. झुंजवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, ज्ञानेश्वर माळवी हे आपल्या शेतात मिरची लागवड करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातील बोअरवेल सुरू होत नसल्याने पाहण्यासाठी गेले असता, अचानक विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतात मिरची लागवडीचे काम करत होते. घटनेची माहिती मिळताच हेस्कॉमचे कार्यकारी अधिकारी कल्पना तिरवीर, नंदगड पोलिस स्थानकाचे सहाय्यक अधिकारी तसेच इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला. ज्ञानेश्वर यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments