- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची सूचना
- प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगावात प्लास्टिक ध्वजांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे. तेव्हा प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास ते जप्त करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास ते तात्काळ जप्त करून कारवाई करावी, असे त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले. प्लास्टिकचे ध्वज विक्रीस सक्त मनाई आहे. प्लास्टिकच्या तिरंग्यासह सजावटीच्या वस्तूंचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी जनतेला केले.
महात्मा गांधीजींच्या काँग्रेस अधिवेशनाची शताब्दी ; १० कोटी रुपयांची देणगी :
स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांनी बैठकीत महात्मा गांधींच्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी सूचना केली. त्याला उत्तर देताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी वर्षभरात काँग्रेसच्या अधिवेशनात साजरी करण्यासाठी १० कोटी रुपयांच्या अनुदानाचे निवेदन सादर केल्याचे सांगितले.
या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर.बी.बसरगी, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, कन्नड व संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, क्रीडा विभागाचे उपसंचालक बी. श्रीनिवास आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments