• जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांची पत्रकार परिषद  

बेळगाव / प्रतिनिधी 

सौंदत्ती तालुक्यात वाटमारी करून एका व्यक्तीकडून ८.६८  हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल चोरणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.  त्यापैकी एक विधिसंघर्षग्रस्त आरोपी आहे.त्यांच्याकडून सोनसाखळी, सोन्याचे ब्रेसलेट, मोबाईल, मोटारसायकल असे सुमारे ८ लाख ६८ हजार किमतीचे विविध दागिने व ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली. 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले , २४ ऑगस्ट रोजी यल्लम्मा डोंगर ते सौंदत्ती दरम्यानच्या शांतीनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीला अडवून सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. याप्रकरणी सौंदत्ती पोलिस ठाण्यात वाटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक बागेवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करून पाचपैकी चार आरोपींना ताब्यात घेतले असल्याचे सांगितले. सीपीआय करुणेश गौडा यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने तपासात बरीच मेहनत घेऊन या दरोड्याचा छडा लावला आहे. गुन्ह्याचा तपास केला असता, एकूण ५ जणांचा या दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. 

यातील आरोपी क्र. १ मुहम्मद इमामसाब कल्लेद याची व फिर्यादी अशोक बागेवाडी यांच्याशी ओळख आहे. मुहम्मद इमामसाब कल्लेद यांच्याकडून अशोकने पूर्वी ५०,००० कर्ज घेतले होते. ते अशोकने वेळीच फेडल्याने त्याची सांपत्तिक स्थिती चांगली असल्याचा विचार करून कल्लेदने साथीदारांच्या मदतीने त्याला लुटण्याचा बेत आखला. यल्लम्मा डोंगर येथे आलेले २ मित्रांनी या कटात त्याला मदत केली. मुत्तन्ना यल्लाप्पा गुत्तेदार, राहणार लिंगसुरू, लालसाब रामपुरे राहणार कुष्टगी तालुक्यातील तोगलुडोनी, इब्राहिम अकबर कुडची, राहणार सौंदत्ती आणि एका बालगुन्हेगाराचा यात सहभाग आहे. बालगुन्हेगाराला सध्या बालसुधारगृहात ठेवले असून अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एसपी भीमाशंकर गुळेद यांनी दिली. यावेळी त्यांनी तपासपथकाचे अभिनंदन केले.