•  नगरपंचायतीला घेराव घालून अधिकाऱ्यांना विचारला जाब

बेळगाव / प्रतिनिधी 

पिरनवाडी (ता.बेळगाव) येथील ग्रामपंचायतीला दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र नगरपंचायत झाल्यापासून नागरिकांच्या समस्यात वाढ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्ते, पाणी आदि सुविधांची कमतरता आहे. अशातच विविध कारणांसाठी लागणारे प्रॉपर्टी कार्ड अर्थात कॉम्प्युटर उतारे देताना ग्रामस्थांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. एका उताऱ्यासाठी चाळीस रुपये सरकारी शुल्क असताना ४ ते ५ हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे असा आरोप करून आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी नगरपंचायत कार्यालयाला ग्रामस्थांनी घेराव घालून अधिकाऱ्यांना जाब विचारला.तसेच विविध मागण्यांचे निवेदन पिरनवाडी माजी ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यातर्फे पिरनवाडी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले म्हणाले, पिरनवाडी ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळून काही उपयोग झालेला नाही. नागरिकांची गैरसोयस अधिक होत आहे.  चाळीस रुपयांत उतारा  उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले असतानाही कर्मचाऱ्यांकडून चार ते पाच हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. तेव्हा कोणत्या कामासाठी किती सरकारी शुल्क (दर) आहे, याचा फरक येथे लावावा अशी मागणी त्यांनी केली. पूर्वीप्रमाणेच कर आकारणी करावी आणि आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी आम्ही आठ दिवसांची मुदत देत आहोत. त्या मुदतीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर जिल्हाधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना भेटून तक्रार देऊन महामार्गावर रास्तारोको करण्याचा इशारा त्यांनी दिला.

तर पिरनवाडी नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष  पिराजी मुचंडीकर  यांनी गावातील घरे दुकाने व अन्य मालमत्तांचा टॅक्स तसेच व्यवसाय परवाना शुल्कनिश्चित करण्यापूर्वी  नगरपरिषदेच्या बैठकीत ग्रामस्थांची परवानगी घेऊन त्याचे शुल्क निर्धारित करावे अशी मागणी केली. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.यावेळी पिरनवाडी  नगरपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.