बेळगाव / प्रतिनिधी
बसुर्ते (ता. बेळगाव) येथे अंगणवाडी मदतनीस सुगंधा मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शनांसह आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी बेळगाव जिल्ह्यात महिलांना संरक्षण मिळत नसल्याचा संताप निदर्शकांनी व्यक्त केला.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेते जी. एम. जैनेखान यांनी अंगणवाडी मदतनीस महिलेवर क्षुल्लक कारणावरून विळ्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्या तिचे नाक व चेहऱ्याला गंभीर इजा झाली आहे. अंगणवाडीतील मुलांनी शेजारच्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडल्याने अंगणवाडी मदतनीस महिलेला शिवीगाळ करून विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. घरमालक कल्याणी मोरे तिला हा हल्ला केल्याबद्दल तातडीने अटक करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने संरक्षण द्यावे अशी मागणी यांनी केली.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments