विजयपूर : दलित विद्यार्थी परिषदेच्या राज्य शाखेतर्फे देण्यात येणारा 'अक्षरदा सावित्रीबाई फुले' राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यंदा अथणी (जि. बेळगाव) येथील कवयित्री, लेखिका आणि अनुवादक प्रभा बाळकृष्ण बोरगावकर यांची निवड करण्यात आली आहे.

शासकीय प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करताना प्रभा बोरगावकर यांच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा विचार करून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. तीन प्रकारचे सृजनशील साहित्य मराठीतून कन्नडमध्ये अनुवादित करण्याचे श्रेय त्यांना जाते. याशिवाय देशातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या कलाकृतींना कन्नड साहित्य परिषद बेंगळूर, बेळगाव जिल्हा साहित्य प्रतिष्ठानचा दत्त निधी पुरस्कार मिळाला आहे.

कर्नाटक राज्य शिक्षक संघ आणि इतर अनेक संघटनांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. उद्या  दि. ३ जानेवारी २०२४ रोजी विजयपूर येथील कंदगल्ला हणमंतराय नाट्यगृहात अक्षरदा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रभा बोरगावकर यांना सदर  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती दलित विद्यार्थी परिषद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष बसवराज गंगुर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.