•  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठा निर्णय 
  •  ठाकरेंना धक्का

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केला. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचे निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व १६ आमदार पात्र ठरवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या १६ पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितले आहे. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्तीदेखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवली आहे. 

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

- शिंदेना पक्षातून हटवण्याचा अधिकार ठाकरेंना नाही. मनात आले म्हणून कुणालाही काढता येत नाही. 

- आधीच्या घटनेनुसार उद्धव ठाकरेंना कोणालाही पदावरून हटवण्याचा अधिकार नाही. पण पक्ष नेतृत्वाचे मत हे पक्षाचे  मत असे  गृहित धरता येत नाही.

- त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत, तो चुकीचा आहे. 

- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही.

- त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे.

- पक्षप्रमुखांचे मत हे अंतिम नाही. त्यामुळे पक्षाच्या घटनेनुसार त्याला एखाद्याला पदावरून काढायचे अधिकार     नाहीत. 

- निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे

- एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती.त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत

- 25 जून 2022 ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा. तसेच या बैठकीत 7 निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या ॲफिडेव्हीटमध्ये करतात. पण या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचे लिहिलंय पण त्याशिवाय त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत.