बेळगाव : न्यू वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली असून आता कर्नाटक सरकारने हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली असून कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यात या नोटीसला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि मागासवर्गीय कल्याण आयोगाच्या सदस्यांनी न्यू वंटामुरी गावाला भेट देऊन तसेच पीडित महिलेचे जिल्हा रुग्णालयात भेट देऊन माहिती घेतली. भाजपच्या सत्यशोधक समितीच्या चार महिला खासदारांनी देखील पीडित महिलेची भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.
पीडित महिलेला पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली असून दोन एकर जमीन देखील मंजूर करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त एस. व्ही. गिरीश यांच्याकडे सोपवण्यात आला असून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी काकती पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजय सिन्नुर यांना निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी आजवर एकूण ११ जणांना अटक करण्यात आली असून आणखी एका संशयित आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सोमवारी बेळगावला येणार असून तपास अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेऊन पुढील तपास सुरू करणार आहेत.
0 Comments