बेळगाव / प्रतिनिधी
उत्तर कन्नड जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत असून या भागासाठी मल्टी स्पेशालिटी रुग्णालय बांधावे, देशातील प्रत्येक व्यक्तीला अन्न, आरोग्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. मात्र, उत्तर कन्नड जिल्हा अजूनही मागे आहे, अनेक विकासकामांपासून वंचित आहे. सरकारने इच्छाशक्तीने उत्तर कन्नड जिल्ह्यासाठी सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले पाहिजे. अशी मागणी करत आज उत्तर कन्नड स्वाभिमानी संघर्ष समितीने बेळगाव सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडले. मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. यावेळी सदर मागणीबाबत अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधण्यात यावे अशी विनंती आंदोलनकर्त्यांनी त्यांच्याकडे केली.
१५ लाखांहून अधिक लोकसंख्या आणि १२ तालुक्यांसह, उत्तर कन्नड जिल्ह्याला विचारवंतांचा जिल्हा होण्याचा मान मिळाला आहे. ज्यांनी महत्त्वाकांक्षी राजकारणी,कलाकार,पत्रकार आणि विविध क्षेत्रात शेकडो कर्तृत्ववान निर्माण केले आहेत. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे योग्य वैद्यकीय महाविद्यालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही. यामुळे जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना योग्य उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. जिल्ह्यातून दररोज ३०० हून अधिक नागरिक दुरच्या मंगळूर किंवा बेरेडे येथे उपचारासाठी जातात. अशावेळी वाटेत होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तेव्हा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि जिल्हापालकमंत्री यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी उत्तर कन्नड संघर्ष समितीतर्फे करण्यात आली.
याप्रसंगी अनंतमूर्ती हेगडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनंतमूर्ती हेगडे म्हणाले की, १५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात १२ तालुक्यांचा समावेश आहे. शिरसी, सिद्धापूर, यल्लापूर, मुंडगोड, हलियाळ, दांडेली या भागांसाठी एक वैद्यकीय, महाविद्यालय आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि कुमठा, अंकोला, कारवार, होन्नावर, भटकळ या भागांसाठी प्रत्येकी दोन रुग्णालये मंजूर करावीत,अशी विनंती त्यांनी केली. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसह वैद्यकीय महाविद्यालय उभारल्यास डॉक्टरांच्या कमतरतेवर मात करता येईल. सरकारने लवकरच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून या भागातील लोकांच्या आरोग्यासाठी योग्य ठिकाणी हॉस्पिटल बांधावे. आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला.
यावेळी आमदार शिवराम हेब्बार यांनी मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांच्यासह आंदोलनस्थळी भेट दिली. अनेक रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला, यासाठी लवकरच उत्तर कन्नड जिल्ह्यांसाठी विशेष रुग्णालय बांधण्यात यावे, असे आवाहन येथील जनतेने त्यांच्याकडे केले. त्याला उत्तर देताना आमदार शिवराम हेब्बार यांनी तुमच्या मागण्या जाणून घेण्यासाठी, मंत्री डॉ. शरणप्रकाश इथे आले आहेत, याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ते भेट घेणार आहेत. या भागासाठी लवकरच स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले जाईल, असे मनापासून वाटते त्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आमदार शिवराम हेब्बर यांनी दिले. यावेळी संतोष नायक,अहेश हेगडे, एस.एन.हेगडे आदी उपस्थित होते.
0 Comments