- अवजड व मध्यम उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांचे आश्वासन
- विधानसौधमध्ये उत्तर बेळगाव इंडस्ट्रियल युनियनच्या प्रतिनिधींसोबत बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
होनगा (ता. बेळगाव) औद्योगिक क्षेत्रातील ज्या व्यावसायिकांनी अद्याप खाते काढलेले नाही, त्यांनी अर्ज केल्यास त्यांना येत्या महिनाभरात खाते उघडून दिले जाईल, असे अवजड व मध्यम उद्योगमंत्री एम.बी.पाटील यांनी सांगितले. गुरुवारी येथील सुवर्ण विधानसौधच्या समिती कक्षात उत्तर बेळगाव इंडस्ट्रियल युनियनच्या प्रतिनिधींसोबत विविध विषयांवर आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानी होते.
होनगा औद्योगिक क्षेत्रात एकूण २३३ उद्योग आहेत. यापैकी २०२ जणांना विक्रीपत्र मिळाले असून केवळ १३१ व्यावसायिकांचे खाते आहे. इतर उद्योगांनाही खात्याची सुविधा द्यावी, अशी विनंती व्यावसायिकांनी केल्यानंतर मंत्र्यांनी हे आश्वासन दिले. होनगा औद्योगिक क्षेत्रातील काही समस्या प्रदीर्घ काळापासून रेंगाळत आहेत. खाते सुविधा ग्रामपंचायतीमार्फत व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीतील भूखंडांसाठी अनेक वर्षांपासून मालमत्ता कर वसूल केला जात नाही. त्यामुळे गाईडची किंमत लागू करताना २०१७ पासून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्व व्यावसायिकांनी सहमती दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळाने होनगा येथील कॅन्टीन इमारतीत प्रशासकीय कार्यालय सुरू करण्याची मागणी केली. यालाही सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल, असे ते म्हणाले.
या बैठकीला युनियनचे अध्यक्ष शिवकुमार, उपाध्यक्ष अजित पाटील, नागेंद्र यांच्यासह ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव अंजुम परवेझ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव सलपाकुमार, बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, उद्योग विभागाचे संचालक रमेश उपस्थित होते.
0 Comments