- लक्ष्मण सवदींची विधानसभेत मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
सोमवार दि. ४ डिसेंबर पासून बेळगावच्या सुवर्णसौध येथे सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातील समस्यांना वाचा फुटेल अशी आशा जनतेमधून व्यक्त केली जात असताना, दोन दिवसांच्या कामकाजात उत्तर कर्नाटक बेळगावमधील प्रश्नांवर कुठेही चर्चा होत नसल्याचे पाहून आमदार लक्ष्मण सवदी यांनी संताप व्यक्त केला. सुवर्णसौध येथे अधिवेशन होत असताना सभागृहाबाहेर ऊस उत्पादक आंदोलन करत आहेत. या भागातील शेतकरी संकटात आहेत. अनेक ज्वलंत समस्या आहेत. अशावेळी विरोधी पक्ष महत्त्वाच्या विषयांना टाळत असल्याबद्दल सवदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी मंत्री अनुपस्थित असल्याच्या मुद्द्यावरून गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुबळी येथील मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात दहा हजार कोटींचे अनुदान जाहीर केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदारांनी सहभात्याग केला. तर विरोधी पक्ष नेते आर.अशोक यांनी केलेल्या ताकद या विधानावरून काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. आमदार विजयेंद्र यांनीही शून्य प्रहार काळात मूळ प्रश्नाऐवजी वेगळ्याच मुद्द्यांवर बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचे अर्ध्या दिवसांचे कामकाज प्रश्नोत्तर काळ वगळता गोंधळातच पार पडले.
0 Comments