बेळगाव / प्रतिनिधी 

देवगिरी ते बंबरगा गावादरम्यानच्या चौकात टिप्पर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बालिकेसह तरुणाचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. मोहन मारुती बेळगावकर (वय २६, रा. बंबरगा) आणि समिक्षा सागर डेळेकर (वय ११, रा.मच्छे) अशी मृतांची नावे आहेत. तर या अपघातात महेश बेळगावकर आणि स्नेहा बेळगावकर हे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, काल बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास कंग्राळी गावातील नातेवाईकांचा विवाह सोहळा आटोपून बंबरगा गावात जात असताना, केदनूर गावातून भूतरामहट्टी गावाकडे माती वाहून नेणारा टिप्पर व कार यांची धडक झाली. ही धडक इतकी जोराची होती की, डिझेलची टाकी फुटून टिप्परने पेट घेतला यावेळी अपघातग्रस्त कारलाही आग लागली.परिणामी आगीत होरपळल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

घटना समजताच नजीकच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.अपघातानंतर टिप्पर चालक तात्काळ पळून गेला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच काकती पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मंजुनाथ हळकुंद यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. या घटनेची नोंद काकती पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇