•  कमांडंट कर्नल एस. दर्शन यांचे प्रतिपादन 

बेळगाव / प्रतिनिधी 

युवा पिढी  ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्यासाठी देशाचा सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणाची माहिती असणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि त्याचे संगोपन करणे हे देखील आपले कर्तव्य असून एनसीसीचेही  हेच मुख्य ध्येय आहे, असे 26 कर्नाटक बटालियन बेळगाव  एनसीसी चे कमांडिंग ऑफिसर,चरण कॅम्पचे कमांडंट कर्नल एस. दर्शन यांनी सांगितले.

बेळगाव एनसीसी ग्रुप अंतर्गत १५  ते २२ डिसेंबर दरम्यान जाधवनगर, बेळगाव येथे आयोजित अखिल भारतीय ट्रॅकिंग शिबिराचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, या शिबीरामुळे तरुणांमध्ये साहसी वृत्ती निर्माण होईल. समाजामध्ये राष्ट्रीय जागृती निर्माण करणे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या युवा शिबीराचा उद्देश आहे.विविध राज्यातील विद्यार्थी बेळगाव परिसराच्या निसर्गसौंदर्याचा एकत्रित आनंद लुटतील. सौजन्य आणि वक्तशीरपणा अंगीकारून समाजासाठी योगदान दिले पाहिजे. आपण निसर्गाचा भाग आहोत आणि असा निसर्ग जपणे आपले कर्तव्य आहे. आपण निसर्गसौंदर्याचा आस्वाद घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी कर्नल शंकर यादव म्हणाले, या शिबीरातून एनसीसी कॅडेट्समध्ये साहसी आणि शोधक वृत्ती, शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि उत्साह निर्माण होईल. निसर्गातील  वनस्पती आणि प्राण्यांबद्दल प्रेम विकसित करते.पर्यावरणीय जंगल, वन्यजीव, पर्यावरण संतुलन, प्राचीन वास्तू आणि स्वच्छता, स्थानिक चालीरीती यांचे संवर्धन करणे हा या शिबिराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विविध भागातून आलेले एनसीसी कॅडेट एकत्र राहून राष्ट्रीय एकात्मता वाढवतील, असे ते म्हणाले.

या ट्रेक आणि कॅम्पमध्ये कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, त्रिची, तामिळनाडू,पाँडिचेरी केरळ, लक्षद्वीप येथील  ५१० एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते.

यावेळी कर्नल शंकर यादव, लेफ्टनंट कर्नल पंकजा कुगाजी, विंग कमांडर दिपाक बलरा, सुभेदार मेजर कल्लाप्पा पाटील, मेजर महेश गुरनाळगौडा उपस्थित होते.