- केंद्रीय भाजप महिला खासदारांच्या पथकाचे न्यू वंटमुरीतील पीडितेला आश्वासन
- बेळगाव जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी
बेळगाव / प्रतिनिधी
न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) येथे एका महिलेला विवस्त्र करून खांबाला बांधून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर त्या पीडित महिलेवर बेळगावच्या जिल्हा रुग्णालय आवारातील सखी वन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.आज शनिवार दि. १६ डिसेंबर रोजी केंद्रीय भाजपच्या महिला खासदारांच्या पथकाने बेळगाव जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्या पीडित महिलेच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी मारहाणीच्या घटनेचा निषेध करून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, या घटनेने घाबरू नका असे आश्वासन तिला देण्यात आले.
दरम्यान केंद्रीय भाजपच्या महिला खासदारांच्या या पथकात खासदार अपराजिता सारंगी, सुनीता दुग्गल, रंजिता कोळी, लॉकेट चॅटर्जी आणि भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आशा लाक्रा यांचा समावेश होता.
यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार अपजिता सारंगी म्हणाल्या की, बेळगाव शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या न्यू वंटमुरी गावात रात्री दीडच्या सुमारास पुरुषांनी घरात घुसून महिलेला बाहेर काढले, विवस्त्र केले, रस्त्यात तिची छेड काढली आणि नंतर तिला एका खांबाला बांधून निर्दयीपणे मारहाण केली. घटनेनंतर दोन तासांनी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मग ही बाब पोलिस निरीक्षकांना कळवली तर तेही उशिरा पोहोचले. एवढा निष्काळजीपणा करण्याइतपत ही किरकोळ घटना नाही. काँग्रेस सरकारची कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. येथे आदिवासी महिलांना संरक्षण नाही. जिल्हापालक मंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील हे कृत्य अमानवी असल्याचे त्यांनी सांगितले.
तर आशा लाक्रा यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडली. मात्र काँग्रेस नेत्यांनी सभागृहात आवाज उठवला नाही. काँग्रेसकडून दलितांचा केवळ व्होट बँकेसाठी वापर केला जात आहे. संपूर्ण सरकार, मुख्यमंत्री, डीजीपी बेळगावात होते पण त्या ठिकाणी भेट दिली नाही. कायद्याने महिलांच्या सुरक्षेसाठी जे काही व्हायला हवे होते ते या कायद्यानंतरही झाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रसारमाध्यमांनी उत्तरप्रदेशातील हातरस आणि मणिपूरमध्ये महिलांवरील हिंसाचारानंतर त्या ठिकाणी जाऊन महिलांचे सांत्वन का केले नाही असा प्रश्न विचारला असता त्यांनी मौन बाळगले.
यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार शशिकला जोल्ले, अभय पाटील, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अनिल बेनके, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली आदि उपस्थित होते.
0 Comments