• एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली
  • लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम लंपास
  • शहरात भीतीचे वातावरण

संकेश्वर / वार्ताहर 

संकेश्वर शहरात दहशत निर्माण करत चोरट्यांनी काल बुधवार दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी एकाच रात्रीत तब्बल तीन बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, संकेश्वर शहरातील हनुमाननगर नजीक एका घरातील कुटुंबिय बाहेरगावी गेले होते. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर घरातील सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने व २ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

यानंतर हौसिंग कॉलनी आणि निडसोशी मार्गावरील बंद असलेल्या प्रत्येकी एक अशा दोन बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी  लाखोंचा ऐवज लांबवल्याची माहिती मिळाली आहे.

बुधवारी एकाच रात्रीत चोरट्यांनी या तीन घरांवर दरोडा टाकल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी संकेश्वर शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.