- सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या मैदानावर प्रशिक्षणोत्तर दीक्षांत संचलन सोहळा
- कठोर प्रशिक्षणानंतर वायू अग्निवीरांचे लक्षवेधी प्रदर्शन
- पहिल्या तुकडीतील १५३ महिलांसह २२८० वायू अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ
बेळगाव / प्रतिनिधी
हवाई दलाच्या पहिल्या महिला अग्निवीर वायू तुकडीचा आणि दुसऱ्या पुरुष अग्निवीर वायू तुकडीचा शानदार दीक्षांत संचलन सोहळा बेळगावातील सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज शनिवारी सकाळी पार पडला. यावेळी १५३ महिला वायू अग्नीवीर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शानदार संचलन करत हवाई दलाच्या सेवेत दाखल झाल्याने आजचा दिवस भारतीय हवाई दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला.
बेळगावातील सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज सकाळी हवाई दलाच्या महिलांच्या पहिल्या तुकडीतील १५३ महिला वायु अग्निवीर आणि पुरुष मिळून एकूण २२८० वायू अग्निवीर देश सेवेसाठी सज्ज झाले. जगातील चौथ्या क्रमांकाच्या भारतीय हवाई दलात या वायू अग्निवीरांना २८ जून २०२३ रोजी प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल करून घेण्यात आले होते. २२ आठवड्यांचे युद्ध कौशल्याचे खडतर प्रशिक्षण घेऊन हे वायू अग्निवीर आज भारतीय हवाई दलात मातृभूमीची सेवा करण्यासाठी सळसळत्या उत्साहाने दाखल झाले. सांबरा एअरमन ट्रेनिंग स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग- इन- चीफ एअरमार्शल आर राधीश यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संचालनाची आणि प्रशिक्षण प्राप्त वायू अग्निवीरांनी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
यानंतर एअरमार्शल आर राधीश यांनी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवून बक्षिसे मिळवलेल्या आणि शानदार संचलन सादर केलेल्या वायू अग्निवीरांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांना संबोधित करताना एअरमार्शल आर राधीश यांनी वायू अग्निवीरांना जागतिक संरक्षण क्षेत्रात उभ्या ठाकलेल्या आव्हानांची माहिती देऊन २२ आठवड्यात घेतलेल्या युद्ध कौशल्य प्रशिक्षणाचा सेवा काळात उपयोग करून घेऊन सतत बौद्धिक क्षमता वाढवून नेहमी आदर्श घेण्यासारखी उज्वल कामगिरी करण्याचे आवाहन केले. जगातील चौथ्या क्रमांकाच्या मोठ्या भारतीय वायुदलात स्वतःच्या पाल्यांना समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी वायू अग्निवीरांच्या पालकांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रशिक्षण प्राप्त उत्साही वायू अग्निवीरांनी मनोगत व्यक्त करताना आज भारतीय हवाईदलात अधिकृतरित्या सहभाग घेऊन देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रशिक्षणात मिळालेल्या कौशल्याचा उपयोग करून चार वर्षे आम्ही निष्ठेने देशसेवा करू आमचे कौशल्य आणखी वाढवून देशाचे संरक्षण करू,असा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी वायू अग्निवीरांच्या पालकांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांनी भारतीय हवाई दलात प्रवेश केल्याचा आनंद ओसांडून वाहताना पाहायला मिळाला.आपल्या मुलांना देशसेवेची खूप चांगली संधी मिळाली आहे, प्रशिक्षणात त्यांनी खूप चांगली कामगिरी केल्याचा आनंद आम्हाला आहे. आमच्या मुलांनी या संधीचे सोने करून देशसेवा करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या काही वायू अग्निवीरांनी आपल्या पालकांचे चरण स्पर्श करून स्वतःच्या वर्दीतील टोपी त्यांच्या डोक्यावर घालून त्यांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. यावेळी पालक आणि प्रशिक्षणार्थी पाल्यांनाही आनंदाश्रू अनावर झाले होते. या दीक्षांत सोहळ्याला हवाई दलाचे अधिकारी, वायु अग्निवीरांचे पालक व कुटुंबीय यांच्यासह इतर उपस्थित होते.
0 Comments