• वाहतुकीसाठी वापरलेल्या वाहनासह दोघांना अटक 
  • बेळगाव उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी ते कावळेवाडी गावापर्यंतच्या मार्गावर गोवा बनावटीचा बेकायदा मद्यसाठा जप्त करण्यात आला. बेळगाव उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई केली. या कारवाईत एकूण २३९.४०० लिटर मद्याच्या ७६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. नागेश नारायण पाटील (वय ३४ रा. शिवाजी गल्ली बहाद्दरवाडी ता. बेळगाव) व साहिल लक्ष्मण पाटील (वय १९ रा. ब्रह्मलिंग गल्ली बहाद्दरवाडी ता. बेळगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मद्यवाहतुकीसाठी वापरण्यात आलेले  ५,००,०००/- रु. किंमतीचे अशोक लेलँड कंपनीचे वाहन आणि ३,५०,०००/- रु. किंमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण ८,५०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

याबाबत प्राप्त माहितीनुसार, बेळगाव झोन क्रमांक - २ च्या उत्पादन शुल्क निरीक्षकांनी कर्मचाऱ्यांसह बेळगाव तालुक्यातील बीजगर्णी गावातून कावळेवाडी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची तपासणी करत असताना एक पांढर्‍या रंगाची अशोक लेलँड कंपनीची चारचाकी मालवाहक गाडी क्र (KA-22 C-9398) थांबवून तपासणी केली असता, वाहनाच्या मागील भागात पार्टिशन केलेले आढळून आले. यानंतर वाहनाची पूर्ण तपासणी केली असता, त्यामध्ये गोव्यातून बेळगावकडे विक्रीच्या उद्देशाने विविध डिझाईन्सच्या ७६० बाटल्यांमधून २३९.४०० लिटर मद्यसाठ्याची वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले. 

अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. वाय मंजुनाथ, सहाय्यक आयुक्त फिरोजखान किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वनजाक्षी एम., जिल्हा उत्पादन शुल्क उपायुक्त रवी एम.,सहआयुक्त विजयकुमार जे हिरेमठ,अबकारी उपअधिक्षक रवी मुरगोड यांच्या नेतृत्वाखाली मंजुनाथ गलगली,अबकारी निरीक्षक सुनिल पाटील, शिपाई महादेव कटगेन्नावर व इतर अधिकारी कर्मचारी यांनीही कारवाई केली. या प्रकरणी मद्यवाहतूक करणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇