बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव सदाशिवनगर स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार निवाऱ्यावरील धोकादायक पत्र्यांचा काही भाग अचानकपणे कोसळला. यावेळी येथे कामावर असलेले मनपा कर्मचारी शंकर कांबळे केवळ दैवबलवत्तर म्हणून सुदैवाने बचावले. आजच्या घटनेनंतर सदाशिवनगर स्मशानभूमीतील धोकादायक,पत्र्यांसंदर्भात मनपा गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही करणार का? की  कुणाच्या जीवावर बेतल्यावर मनपाचे डोळे उघडणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून केला जात आहे. 

सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार निवाऱ्यावरील पत्रे धोकादायक स्थितीत आहेत. स्मशानभूमीतील धोकादायक स्थितीतील पत्र्यांसंदर्भात प्रसार माध्यमातून अनेकवेळा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मनपा प्रशासनाला सदाशिवनगर स्मशानभूमीतील धोकादायक पत्र्यांची माहिती असतानाही प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव शहरातील महत्त्वाच्या सदाशिवनगर स्मशानभूमीतील अंत्यविधी चौथऱ्यावरील निवार्‍याचे पत्रे खराब झाले आहेत. खराब झालेल्या पत्र्यांमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना जीवाचा धोका निर्माण झाला आहे.चार महिने उलटूनही स्मशानभूमीतील खराब पत्र बदलण्यात आले नाहीत.त्यामुळे दिवसेंदिवस खराब  झालेल्या पत्रांची अवस्था बिकट होऊ लागली आहे. कोणत्याही क्षणी खराब झालेले पत्रे खाली कोसळून मोठ्या धोक्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.खराब पत्र्यांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या संदर्भात अनेकवेळा माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.

त्याचबरोबर अनेक नागरिकांनी सदाशिवनगर स्मशानभूमी येथील धोकादायकपत्रांसंदर्भात महापालिकेला माहिती दिली आहे.मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या महापालिका प्रशासनाला सदाशिवनगर स्मशानभूमीतील संभाव्य धोक्याची अद्यापही जाणीव झालेली नाही. 

सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करत असतात. खराब पत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यातच आज गुरुवारी सकाळी रक्षाविसर्जनासाठी स्मशानभूमीत नागरिकांनी गर्दी केली होती. या ठिकाणी सेवा बजावणारे मनपा कर्मचारी शंकर कांबळे हे देखील उपस्थित होते. अचानकपणे निवाऱ्यावरील पत्र्याचा एक भाग शंकर कांबळे यांच्या बाजूला कोसळला. यामध्ये शंकर कांबळे केवळ सुदैवाने थोडक्यात बचावले. निवाऱ्यावरील पत्रा शंकर कांबळे यांच्या अंगावर कोसळला असता तर, मोठी  दुर्घटना घडली असती.आजच्या या घटनेचा धसका उपस्थित नागरिकांनी घेतला. अनेकांनी यावेळी मनपा प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला. कोणाचा जीव गेल्यावरच महापालिका सदाशिवनगर स्मशान भूमीतील धोकादायक पत्रे बदलणार का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित नागरिकांनी केला.