• तहसीलदार प्रकाश गायकवाड यांचा आदेश 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यात माती वाळू व इतर खनिज पदार्थांची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. याप्रकरणी पोलीस महसूल आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा न दाखविता वाहने जप्त जप्त करावी असा आदेश तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी बजावला आहे. परिणामी बेकायदा वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.

तहसीलदारांनी मंगळवार (दि. २१) रोजी जारी केलेल्या आदेशात, एमएमआरडी कायदा १९५७ कलम ४, ४ (१) ए २१ आणि २२ नुसार परवानगीशिवाय माती, वाळू मिश्रितमाती आणि वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी वाहने आणि वाहन मालकांवर कायदेशीर कारवाईची तरतूद असल्याचे म्हटले आहे. तथापि याबाबत अलीकडेच तालुक्यात तपासणी केली असता अनेक वाहने खाण व भूगर्भ विज्ञान खात्याचा अधिकृत परवाना न घेता माती, वाळू मिश्रित माती व इतर खनिज पदार्थांची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे.यामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही नुकसान होत आहे.

भविष्यात असे प्रकार आढळून आल्यास नियमानुसार वाहने जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करावी त्याचा सविस्तर अहवाल आपल्या कार्यालयाला पाठवावा. खानापूर, लोंढा, नागरगाळी, गोलिहळळी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनीही आपापल्या कार्यक्षेत्रातील वाहने जप्त करून कारवाई करावी असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

  • महसूल निरीक्षक, तलाठ्यांनाही अधिकार 

विनापरवाना माती व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी तालुका प्रशासनाने कंबर कसली आहे. खानापूर व नंदगड पोलीस निरीक्षकांना धडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील सर्व उप तहसीलदार महसूल निरीक्षक आणि तलाठी यांनाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. वाहन जप्त करून ते नजीकच्या पोलिस स्थानकात जमा करण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत.

  • वीट व्यावसायिकांनाही बसणार फटका !

खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीट व्यावसायिक आहेत. बहुतांश वीट व्यावसायिक शाडू मिश्रीत, साडू युक्त माती वाहतूक करतात. अनेक ठिकाणी माती उपलब्ध नसल्याने दुसरीकडून माती आणून वाहतूक केली जाते. पण या आदेशांतर्गत अशा वाहनांना देखील लक्ष्य करून चौकशी करण्याचे प्रकार होणार आहेत. त्यामुळे सदर आदेशामुळे वीट व्यावसायिकांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे.