बेळगाव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे.विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासह सर्वांना योग्य निवास, भोजन व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या व्यवस्थेची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, अशी सूचना कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू.टी.खादर यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.

पुढील डिसेंबर महिन्यात सुवर्णसौध येथे होत असलेल्या, विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण विधानसौध येथील सभागृहात आज मंगळवारी (७ नोव्हेंबर) विविध समित्यांच्या अधिकारी व प्रमुखांच्या बैठकीत यु. टी. खादर अध्यक्षस्थानी होते.
अधिवेशनादरम्यान कोणालाही कसल्याही प्रकारचा त्रास अथवा अडथळा होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. काही अडचणी असल्यास किंवा अधिक सोयीची आवश्यकता असल्यास त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. विविध विभागांचे अधिकारी व समित्यांनी आपणावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाव्यात.
हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी, मान्यवरांसह हजारो लोक येणार आहेत. त्यामुळे उत्तम व दर्जेदार भोजन, निवास, वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
डिसेंबर महिन्यात अधिवेशनाबरोबरच, लग्न समारंभ एकाच वेळी असल्याने, जनतेच्या सोयीसाठी शहरातील काही विशिष्ट हॉटेल्समध्ये 10% निवासाची व्यवस्था करण्यात यावी. हॉटेलमालक आणि जनतेला आगाऊ माहिती द्यावी, असे विधानसभेचे अध्यक्ष यू.टी.खाडर यांनी सांगितले.