खानापूर / प्रतिनिधी
दुचाकीची ट्रकला पाठीमागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. राष्ट्रीय महामार्गावर देसूर अलमा फॅक्टरी नजीक शुक्रवारी रात्री १० वा. सुमारास ही घटना घडली. पंकज नारायण जांबोटकर (वय २३, रा. शिवोली, ता. खानापूर) असे मृत युवकाचे नाव आहे.त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे.सदर मृत युवक शिरोलीतील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नारायण गोविंद जांबोटकर यांचा एकुलता एक चिरंजीव होता.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, मृत पंकज हा किणये मार्गावरील नावगे क्रॉस नजीक एका कंपनीत कामाला होता. काल शुक्रवारी काम संपवून तो बेळगाव येथे नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याला घरी येण्यास उशीर झाल्याने वडिलांनी अपघात होण्यापूर्वीच अर्धा तास फोन करून त्याला उशीर का झाला असे विचारले होते. त्यावर पाऊस येत असल्याने थोड्या वेळात पोहोचतो असे पंकज ने सांगितल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण वाटेत येताना देसूर नजीक अलमा कारखान्याजवळ बेळगाव खानापूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका निलगिरी लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकला त्याच्या दुचाकीची पाठीमागून जोरात धडक बसल्याने तो रस्त्याकडेला उडून पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे शिवोली, चापगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments