मनोहर हुंदरे चलवेनहट्टी 

अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलेला असून गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते आणि अखेर काल प्रत्यक्ष पावसाला सुरवात झाल्याने बळीराजाची धांदल उडाली आहे. पावसाळ्यात पाऊस न लागल्याने विद्युत पंप सेटच्या माध्यमातून रात्री - अपरात्री पाणी पुरवठा करुन जगलेल्या भात पिकाची शेतकऱ्यांनी कापणी केली आहे. पण ऐनवेळी वातावरणात बदल होऊन पावसाचे संकट शेतकऱ्यावर ओढवले असून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे पिंजर कुजून वर्षभराच्या चाऱ्याचा प्रश्न सुध्दा गंभीर होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठी चिंता लागली आहे.  

चलवेनहट्टी, हंदिगनूर, अगसगे, कडोली, जाफरवाडी, केदनूर, अतिवाड, बोडकेनहट्टी, म्हाळेनहट्टी या भागातील शेतकऱ्यांची भाताची मळणी करण्यासाठी धावपळ उडाली आहे. जेव्हा गरज होती त्यावेळी तेव्हा पाऊस लागला नाही. पण आता नको त्यावेळी पाऊस लागल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाच्या भीतीने सगळ्यांची एकदम सुरु झाल्याने मनुष्यबळ अपुरे पडत आहे.  त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.