बेळगाव / प्रतिनिधी 

शुक्रवारी बेळगाव विश्वेश्वरय्या नगर येथील शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना ट्रायसिकल, श्रवणयंत्र व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ उपस्थित होते. 

याप्रसंगी ते म्हणाले, दिव्यांग मुलेही निष्पाप असतात. आज आवश्यक साहित्य मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. त्यांचा आनंद पाहून मलाही समाधान वाटत आहे. पालकांनी, समाजाने अशा मुलांना ओझे समजू नये. दिव्यांग असले तरी अशा मुलांना निसर्गाने वरदान दिलेले असते. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यास, त्यांना आवश्यक सुविधा दिल्यास ती कर्तृत्व प्राप्त करू शकतात असे त्यांनी सांगितले. 

शासन आणि शिक्षण विभाग अशा मुलांना मदत करत आहे. मी वैयक्तिक पातळीवरही मदत करणार आहे. त्यांच्या सोयीसाठी शासन अनुदान देत राहील, असे ते म्हणाले. यावेळी आमदार राजू सेठ यांच्याहस्ते दीडशेहून अधिक मुलांना शिक्षण विभागाकडून व्हीलचेअर, ट्रायसायकल, क्रॅचेस, श्रवणयंत्र व इतर साहित्य  वितरीत करण्यात आले. 

प्रारंभी गटशिक्षणाधिकारी प्रभुपती हिरेमठ यांनी प्रास्ताविक करून उपकरणे मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या शाळा व विद्यार्थ्यांचे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या शासकीय शाळांमधील विद्यार्थी, पालक व शिक्षण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.