सुळगा (हिं.) / वार्ताहर
"गुरु ब्रह्मा...गुरु विष्णु... गुरु देवो महेश्वरा...गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै: श्री गुरवे नमः" शाळा अर्थात विद्या आणि ज्ञानाचे मंदिर आणि तिथे शिक्षकांनी केलेल्या संस्कारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, सुळगा (हिं.) ता. बेळगाव येथील ब्रह्मलिंग हायस्कूलच्या सन २००२-२००३ सालच्या माजी विद्यार्थ्यांनी मण्णूर येथे रविवार दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित केलेला स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सुळगा (हिं.) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आणि ब्रह्मलिंग हायस्कूलचे शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने उपस्थित सर्व शिक्षकांचे शाल,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक चिगरे सर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिगरे सर यांच्याहस्ते श्री सरस्वती देवी प्रतिमापूजन तर ब्रह्मलिंग हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर.एन.हुलजी यांच्याहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ब्रह्मलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एम. मुतगेकर, रामू घुगवाड सर, चिगरे सर यांनी मनोगत व्यक्त करताना, ज्ञानार्जन व शिक्षा या आठवणींबरोबर मर्मबंधातली ठेव उलगडली.
शाळेमध्ये शिक्षकांनी लावलेल्या कडक शिस्तीमुळेच हातावर छडीचा मार घेतलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी नावलौकिक प्राप्त केला आहे. आम्ही घडविलेले अनेक विद्यार्थी - विद्यार्थिनी आज विविध क्षेत्रात नोकरी - व्यवसायात उच्च पदावर कार्यरत आहेत तर काही यशस्वी उद्योजक बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी हा सोहळा आयोजित करून दाखविलेल्या सृजनशीलतेमुळे समाधान वाटले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते अतूट असते. विद्यार्थ्यांची स्वतःच्या शाळेशी जोडलेली नाळ अजूनही कायम आहे. माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून त्याचे प्रत्यंतर घडल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षकांनंतर माजी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी शाळा आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी शालेय जीवनानंतर एकत्र आलेल्या मैत्रिणींनी संगीत खुर्ची खेळण्याचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज पाटील यांनी केले. तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. एकंदरीत माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा स्नेहमेळावा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
0 Comments