• माधुरी दीक्षितने जिंकली मने ; सिनेरसिकांना अनोखी पर्वणी  
  • गोवा राज्यात फिल्मसिटी होणारच 
  • मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

पणजी दि. २१ नोव्हेंबर २०२३ : 

राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर, चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सोमवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) चा उद्घाटन सोहळा जल्लोषात पार पडला. हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री माधुरी दीक्षित तिने नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच शाहिद कपूर, नुसरत बरूचा, श्रेया सरन यांनी नृत्य सादर करत लोकांना मंत्रमुग्ध केले.  गायक सुखविंदर सिंग व श्रेया घोषाल यांनीही गीत सादर करत लोकांना आपल्या तालावर थिरकवले. दरम्यान गोवा मनोरंजन संस्थेने फिल्मसिटी साठी प्रस्ताव मांडला असून, लवकरच गोव्यात फिल्मसिटी होणारच, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांच्या हस्ते ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्रालय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, दिग्दर्शक करण जोहर, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, मंत्री सुभाष फळ देसाई तसेच आमदार राज्याचे मुख्य सचिव उपस्थित होते. अभिनेता अपारशक्ती खुराना, अभिनेत्री करिश्मा तन्ना यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले. गोव्यात आलेल्या देशी-विदेशी प्रतिनिधींनी इफ्फीचा मनमुराद आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

महोत्सवात सात कोकणी चित्रपट दाखवणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी २००४ सालापासून गोव्यात इफ्फीचे आयोजन केले जाते. चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. समाजाचे चित्रण चित्रपटांतून होते. दरवर्षी राज्यातील कोंकणी चित्रपट इफ्फीत दाखविण्यात येतात आणि यावर्षी कोकणी विभागासाठी ७ चित्रपट निवडण्यात आले असून, ते महोत्सवात दाखविण्यात येतील. गोवा मनोरंजन संस्थेने फिल्म सिटी साठी प्रस्ताव मांडला असून, लवकरच गोव्यात फिल्मसिटी होणारच, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी उद्घाटन सोहळ्यावेळी सांगितले.

चित्रपटांचा  दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो :  केंद्रीय मंत्री अनुरागसिंह ठाकूर

चित्रपटांचा आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव पडतो. तसेच आपल्या संस्कृतीचे दर्शनही चित्रपटांच्या माध्यमातून होते. चित्रपट सृष्टीचा वाढता कल पाहता भविष्यात काही वर्षांनी मीडिया क्षेत्राने भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, तसेच भारतात चित्रपट करण्यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपटांना अनुदान दिले जाईल. तसेच विविध सुविधा दिल्या जातील असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण युवा व्यवहार क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी सांगितले.

'कसे आसात...' : माधुरी दीक्षित 

या महोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या माधुरी दीक्षित यांनी 'कसे असात... असे म्हणत गोमंतकीयांची मने जिंकली. त्या म्हणाल्या, मी ३८ वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले आहे. मला योग्य वेळी आणि चांगली संधी मिळाली नाही आज मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले, लोक सुट्टी निमित्त गोव्यात येतात, आता बहुतांश लोक इफ्फीसाठी आवर्जून येतात, असे त्या म्हणाल्या.

आठ दिवस राज्य इफ्फीमय... 

सोमवारी तळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर थाटात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. आता सलग आठ दिवस चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सोहळा राज्यात होणार आहे. या सोहळ्याला सिने अभिनेता आणि अभिनेत्रींची खास उपस्थिती हेच नेहमी आकर्षण राहिले आहे. त्याचप्रमाणे दर्जेदार चित्रपटांची मेजवानी येथे सिनेरसिकांना मिळणार आहे. यंदाही अशीच अपेक्षा ठेवत सिने रसिकांनी गर्दी केली आहे. इफ्फी निमित्त राजधानी पणजीत सजावट करण्यात आली आहे. मांडवीतीर ते दिवजा सर्कल, गोवा मनोरंजन संस्था ते मिरामार पर्यंत विद्युत रोषणाई केली आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्थेच्या समोरच नवीनच तयार केलेला योगसेतूही सिने रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

कॅचिंग डस्टरने उघडला पडदा :

५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पडदा कॅचिंग डस्ट या ब्रिटिश चित्रपटाने उघडला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रतिनिधींची गर्दी झाली होती. तिकीट मिळवण्यासाठी लांब पर्यंत रांगा लागल्या होत्या. स्टुअर्ट गडू यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून,याच वर्षी हा चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला आहे.

दिग्गज कलाकार उपस्थित :

यंदाच्या इफ्फीत अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक मधुकर भंडारकर, के.के.मेनन, बोनी कपूर, गुलशन ग्रोव्हर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गोन्साल्विस हे कलाकार सहभाग घेतील. उद्घाटनाला मायकल डग्लस, बिल्टी मेंडोझा, बेंडन गाल्वीन  हे विदेशी कलाकार तर माधुरी दीक्षित सनी देओल, शाहिद कपूर, सारा अली खान व इतर कलाकार आले होते.

सात हजार प्रतिनिधींची नोंदणी :

यंदाच्या इफ्फीला आत्तापर्यंत ७ हजारांहून  अधिक प्रतिनिधींची नोंदणी झाली आहे. एक दिवसाचा विशेष पासही देण्याची सोय गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रवेशद्वाराकडे केली आहे. गोमंतकीय आणि पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले आहे.