• मंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना 
  • पाणी टंचाई - दुष्काळ व्यवस्थापनाबाबत सुवर्ण विधानसौध येथे बैठक 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत टास्क फोर्सच्या बैठका घेऊन योग्य आराखडा तयार करण्यात यावा, राज्य सरकारने दुष्काळ व्यवस्थापनासाठी जिल्ह्याला यापूर्वीच २२.५० कोटी रुपये दिले असून, एकूण ३२ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. टंचाई  व्यवस्थापनाच्या कामांसाठी आर्थिक अडचण येणार नाही असे सार्वजनिक बांधकाम तथा बेळगाव (जिल्हा पालकमंत्री) सतीश जारकीहोळी म्हणाले, दुष्काळ व्यवस्थापनाबाबत सुवर्ण विधानसौध येथे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवताच टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात यावा. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीने स्वतःचा टँकर खरेदी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,अशी सूचना त्यांनी केली. काही वर्षांपूर्वी सर्व ग्रामपंचायतींना स्वतःचा टँकर घेण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे यावेळी प्रत्येक ग्रामपंचायतीने टँकर खरेदी करून त्यांना यादी उपलब्ध करून द्यावी, टँकर खरेदी न केल्यास संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मान्सून पावसाविना सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. हिवाळी पिकांसाठी आर्द्रतेची कमतरता आहे. पर्यायी पिकांसाठी आवश्यक बियाणांचा साठा आहे. बियाणे व खतांचा तुटवडा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले. तर जिल्हा पंचायत चे मुख्य कार्यकारी हर्षल भोयर यांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा व कुपनलिका दुरुस्ती व इतर कामांसाठी शासनाकडे ३५ पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्यसभा सदस्य खा.इराण्णा कडाडी यांनी भूसंपादन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे महसूल, विशेष भूसंपादन अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी परस्पर समन्वय साधून तोडगा काढण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते शेतकऱ्यांना चारा संच वाटप करण्यात आले. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.