•  बेळगाव - वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको 

चंदगड / प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला बळ देण्यासाठी चंदगड, कोवाड, मलतवाडी, देवरवाडी येथे साखळी उपोषण करण्यात आले.‌ पाटणे फाटा येथे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको करून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्य सरकारला जागं करण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी कोवाडमध्ये पांडुरंग जाधव, चंदगड येथे सुरेश सातवणेकर, पाटणे फाटा विष्णू गावडे, देवरवाडी पुंडलिक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान सकल मराठा समाजाच्यावतीने पाटणे फाटा येथे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर सुमारे एक तास रास्तारोको केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.‌ यामध्ये पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, ज्योती पाटील, देवाप्पा बोकडे, दिपक पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.‌ यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणाला पाठिंबा दिला. 

तत्पूर्वी मजरे कारवेमध्ये सरपंच शिवाजी तुपारे, अशोक हारकारे, यल्लुप्पा वेसणे, शरद पाटील यांनी तर  देवरवाडी, किणी, तडशिनहाळ, शिनोळी बुद्रुक यासह अनेक गावात सोमवारी रात्री कॅंडल मार्च काढून जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. तसेच गुरुवारी राजगोळी खुर्द ते मजरे कारवे अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे.‌

- लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा 

आमदार राजेश पाटील यांनीही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली. भाजपा नेते शिवाजीराव पाटील यांनी मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेत तर माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कोवाड येथे साखळी उपोषणाला पाठिंबा दिला.‌

पाटणे फाटा येथे बेळगाव -वेंगुर्ला मार्गावर रास्तारोको आंदोलन करणार आले. यावेळी पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, ज्योती पाटील, विष्णू गावडे सहभागी झाले होते.