• कर्नाटक भीमसेनेची मागणी 
  • बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने 
  • जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बैलहोंगल व खानापूर तालुक्यामध्ये सुरळीत बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी आज सोमवारी कर्नाटक भीमसेनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक सह जिल्हाधिकारी कार्यालय समोर  जोरदार निदर्शने केली. यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना कर्नाटक भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार म्हणाले, खानापूर तालुक्यासह बैलहोंगल आणि पुलारकोप्प या गावासह अनेक गावांसाठी सुरळीत बस सेवा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज ५ ते ११ किमी पायी चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळा महाविद्यालयाला जाण्यास उशीर होत आहे.

बैलहोंगल व खानापूर तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. येथील जनता आणि विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. तेव्हा बैलहोंगल परिवहन विभाग व बेळगाव परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकाऱ्यांनी तातडीने बसेस सुरू करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी कर्नाटक भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मादार, उपाध्यक्ष अक्षय के.आर.,जिल्हा कार्याध्यक्ष मल्लाप्पा अक्कमट्टी,अजय शिंगे, विजय कोटकार, उदय बासुजी आदि उपस्थित होते.