• बेंगळूर विशेष लोकप्रतिनिधी न्यायालयाचे निर्देश 
  • धारवाड जि. पं. सदस्य योगेश गौडा खूनप्रकरणी शिक्षा 

धारवाड / वार्ताहर 

धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या खून प्रकरणी आरोपी असलेले पोलिस निरीक्षक चेन्नकेशव टिंगरीकर आज बेंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात हजर झाले. या प्रकरणी टिंगरीकर यांना न्यायालयीन कोठडी सुनावविण्यात आली आहे. याआधी तीनवेळा खटल्याला गैरहजर राहिलेल्या टिंगरीकर यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. 

योगेश गौडा यांची हत्या झाली तेव्हा चेन्नकेशव टिंगरिकर हे धारवाड उपनगर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक आणि या प्रकरणाचे तपास अधिकारीही होते. सदर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आल्यानंतर या प्रकरणाची दिशा वळविण्याचे कामही टिंगरीकर यांनी केले होते. यानंतर सीबीआयने टिंगरीकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई केली होती. मात्र, यापूर्वी टिंगरीकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने ते बचावले. अटकपूर्व जामिनाची मुदत संपल्यानंतर टिंगरीकर यांनी स्वतः विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने तीन वेळा खटल्याला गैरहजर राहिलेल्या टिंगरीकर यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. 

काल सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी टिंगरीकर यांच्या धारवाड, मलप्रभानगर येथील निवासस्थानी धाड घालून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तत्पूर्वी फरार झालेले टिंगरीकर आज बेंगळूर येथील लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर झाले. टिंगरीकर पोलीस अधिकारी म्हणून सुनावणीला  गैरहजर असल्याचे सांगत न्यायालयाने त्यांची कोठडी सुनावली.