- जिवंत देखाव्यांनी साकारला शिवकाळ
- सर्व वयोगटातील शिवप्रेमींचा उस्फूर्तपणे सहभाग
बेळगाव / प्रतिनिधी
देव, देश आणि धर्म रक्षणाचा संदेश देत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात दुर्गामाता दौड काढण्यात आली.
आजच्या दौडला शिवरायांच्या विश्वासू मावळ्यांपैकी एक हिरोजी इंदुलकर यांचे १३ वे वंशज संतोष इंदुलकर आणि सरसेनापती हांबिरराव मोहिते यांचे १३ वे वंशज जयाजी मोहिते आणि उद्योजक प्रकाश चौगुले यांची उपस्थिती होती.
प्रारंभी ताशिलदार गल्ली येथील सोमनाथ मंदिरापासून आज सोमवारच्या दौडला प्रारंभ झाला. यावेळी आरती करून संतोष इंदुलकर यांच्या हस्ते ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडला सुरुवात झाली. पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करून लहान मुले - मुली, युवक - युवती आणि अन्य वयोगटातील नागरिक उत्साहात दौडमध्ये सहभागी झाले होते.गल्लोगल्ली महिलांनी औक्षण करून दौडचे स्वागत केले. अनेक ठिकाणी दौड मधील धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी ताशिलदार गल्ली विभागाकडून प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. त्यांनतर जयाजी मोहिते यांनी बेळगावमधे सुरू असलेल्या दुर्गामाता दौडचे कौतुक केले. तर हिरोजी इंदुलकर यांचे वंशज संतोष इंदुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वराज्यासाठी आपले मावळे जसे एकनिष्ठ होते त्याचप्रमाणे आपण ही एकनिष्ठ राहून आपले कार्य करूया असे उद्गार त्यांनी काढले. यानंतर नगरसेविका वैशाली भातकांडे, अमुल्या बरमनी, अपूर्वा बरमनी यांच्याहस्ते शनि मंदिर येथे आरती करण्यात आली. त्यांनतर ध्येय मंत्र म्हणून संतोष इंदुलकर आणि जयाजी मोहिते यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला.
एकंदरीत दुर्गामाता दौडच्या माध्यमातून शिवकाल जिवंत करणारा हा सोहळा लक्षवेधी ठरला. छत्रपती शिवरायांच्या गुणगौरवाने शहराचा मध्यवर्ती परिसर दुमदुमला. त्यामुळे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
0 Comments