बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या दोन दशकांपासून बेळगावातील वैशिष्ट ठरलेल्या बेळगाव शहर देवस्थान कमिटी व श्री देवदादा सासनकाठी ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या दसरा महोत्सवाची गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेली तयारी आता अंतिम टप्यात आली आहे. मराठी विद्यानिकेतन येथील दसरा मैदानावर दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी सायंकाळी ६ वाजता ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या दसरा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शहर देवस्थान व चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी भक्त मंडळाच्या पदाधिकारी यांच्या नेतृत्वातील गेली दोन दशकांपासून पासून ही परंपरा सुरु आहे. दसरा महोत्सवात चव्हाट गल्ली येथील देवदादा मंदिरातून विधिपूर्वक नंदीचे (कटल्याचे) पूजन करून पारंपरिक पद्धतीने वाद्य व ढोल ताशांच्या गजरात गल्लीतील सासनकाठी व पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढली जाते. परंपरेने चालत आलेल्या रूढीप्रमाणे आजही चव्हाट गल्लीतील सासनकाठी व नंदी मारुती गल्लीत आल्यावर मिरवणुकीला सुरुवात होते. प्रामुख्याने मारुती गल्ली येथील मारुती मंदिराजवळ कपलेश्वर मंदिरातील पालखी, समादेवी गल्लीतील पालखी, मारुती गल्लीतील मारुती देवाचे वाहन, मातंगी देवीची पालखी, कसाई गल्ली, बसवाण गल्ली येथील बसवाण देवाचे वाहन, या सर्व देवस्थानच्या पालख्या मारुती गल्ली येथे जमतात व चव्हाट गल्लीचा नंदी मिरवणुकीत दाखल झाल्यानंतर नंदीला अग्रस्त ठेवून या सर्व पालख्य मिरवणुकीत दाखल होतात.
ऐतिहासिक दसरोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित जनसमुदायामुळे मराठी विद्यानिकेतच्या मैदानावर गर्दी होत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेळगावात अन्य कुठेही दसरोत्सवाचे आयोजन होत नाही. ही दोन दशकाची परंपरा पुढे सुरु राहावी हाच या उत्सवामागील मुख्य उद्देश आहे.
0 Comments