खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या श्री महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर्सच्या २०२३ - २४  च्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ दि. २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला. लैला शुगर्स येथे झालेल्या या कार्यक्रमास कर्नाटक रयत मोर्चा भाजप अध्यक्ष व राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून  गाळप हंगामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लैला शुगर्सचे चेअरमन व खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर, पत्नी रुक्मिणी हलगेकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. अवरोळी मठाचे पूज्य चन्नबसदेवरु रुद्रस्वामी मठ बिळकी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

  • हक्काच्या कारखान्याला ऊस पाठवून सहकार्य करा : राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी

खानापूर तालुक्यात एकमेव असलेला लैला शुगर्स हा कारखाना यशस्वीरीत्या चालविण्यासाठी महालक्ष्मी ग्रुपने धाडस करून या कारखान्याची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. हा कारखाना येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काचा असल्याने शेतकऱ्यांनी अधिक ऊस पाठवून या कारखान्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. कारखान्याचे चेअरमन तथा आमदार व त्यांच्या संचालक मंडळाने कारखान्याच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी कारखान्याच्या संचालक मंडळाने पारदर्शकरित्या काम हाती घेतल्याबद्दल आमदार विठ्ठल हलगेकर व संचालक मंडळाचे त्यांनी कौतुक केले.

  • ३ लाखावर अधिक ऊस गाळप झाल्यास अधिक दर : लैला शुगर्सचे चेअरमन तथा आ. विठ्ठल हलगेकर

याप्रसंगी बोलताना लैला शुगर्सचे चेअरमन तथा आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, या कारखान्याची जबाबदारी धाडसाने घेतली. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वासार्हता दर्शवून मला आमदार करण्यासाठी मोठा वाटा उचलला. त्यामुळे कारखान्याला कोणत्याही प्रकारे धोका पोहोचणार नाही, आणि शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहे. मागील वर्षी कारखान्याने तीन टप्प्यात २८०० रु. दर दिला आहे. तसाच दर यावर्षीही एक कलमी २८०० रु. ऊस पुरवठा केलेल्या पंधरवड्यात देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून अधिक दर देण्यासाठी ही आमचा प्रयत्न राहील. जर कारखान्याचे गाळप यावर्षी तीन लाखापेक्षा अधिक झाल्यास दुसरा हप्ता देण्याचा विचार व्यवस्थापन मंडळांनी सुरू केला आहे. तालुक्यातील व तालुक्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अधिकाधिक ऊस पाठवून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी लैला शुगर्सचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कारखान्याने यावर्षी गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीएफ दरानुसारच ऊस बिल दिले जाणार आहे. यावर्षी स्थानिक वाहतूकदार व तोडणी धारकांना प्राधान्य दिले जाणार आहे. परप्रांतातून येणाऱ्या तोडण्या कमी करण्यात आल्या असून शेतकऱ्यांनी स्वतःचा ऊस पाठवण्यासाठी विशेष प्रयत्न हाती घ्यावेत तोडणी दर ३२५ रु. दिला जाईल असे त्यांनी सांगितले.