• तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय 

बेळगाव / प्रतिनिधी 

सीमाप्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला जात आहे. बेळगावसह ८६५ गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली. याचा निषेध म्हणून १ नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूकसायकल फेरी काढली जाते. गेल्या काही वर्षांपासून या फेरीला प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात आहे, असे असले तरी सायकल फेरी काढणारच, असा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच बुधवार दि. १ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आदेशानुसार काळादिन गांभीर्याने पाळून मूक सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

मराठा मंदिर येथे झालेल्या तालुका म. ए. समिती बैठकीच्या  अध्यक्षस्थानी ॲड. राजाभाऊ पाटील होते. यावेळी सचिव एम.जी.पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निर्देशानुसार खानापूर, बेळगाव, निपाणी येथील घटक समितींकडून याची कार्यवाही केली जाते. जिल्हा प्रशासनाकडून मुख्य सायकल फेरीला परवानगी देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी समितीकडून परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाही दिली तरी काळा दिन गांभीर्याने पाळला जाणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.