•  जोरदार घोषणा देत केली निदर्शने 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील दलित विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात आज बुधवारी विविध दलित संघटनांनी महापालिकेसमोर निदर्शने केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी  महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचा आमदार अभय पाटील यांनी छळ केल्याचा आरोप केला. अशोक दुडगुंटी हे दलित असल्याने त्यांच्यावर खोटे आरोप केले जात असल्याच्या निषेधार्थ महिलांसह विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आ.अभय पाटील यांच्या विरोधातढोल व नगारा वाजवत आंदोलन करून जोरदार घोषणा दिल्या. 

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, दलित संघटनेचे नेते रवी यांनी बेळगाव महापालिकेत ६० टक्क्यांहून अधिक दलित समाजाचे अधिकारी आहेत. मात्र आ.अभय पाटील दलित अधिकाऱ्यांना त्रास देत असून महापालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची टीका केली. तर श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर म्हणाले, बेळगावच्या महापौर मराठी भाषिक आहेत तर महापालिकेतील दलित अधिकारी चांगले काम करत आहेत, मात्र आमदार अभय पाटील त्यांच्या विरोधात कारस्थान करत असून दलित अधिकारी आणि मराठी भाषिक नगरसेवकांना नाहक वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

याप्रसंगी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव महापालिका कार्यालयात उपस्थिती दर्शवून आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी विविध दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.