बेळगाव / प्रतिनिधी

जनतेची दिशाभूल करून कर्नाटकातील काँग्रेस राज्य सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप परत आज भाजपने बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात तीव्र निदर्शने केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. देशात होणाऱ्या विविध निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाच्या हाय कमांडने पैसे देण्याचा आदेश राज्य काँग्रेसला दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजप महानगर अध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके म्हणाले, निवडणुकीपूर्वी हमी योजना लागू करण्याचे आमिष दाखवून  सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार प्रत्यक्षात या हमी योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. हमी योजना लागू करण्यासाठी या राज्य सरकारने आधीच जनतेला वेठीस धरले आहे. भाजप सरकारवर ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेस पक्षातील नेत्यांच्या घरी आता कोट्यावधी रुपये सापडले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने भ्रष्टाचार करण्याकडे  लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात विकास कामे राबवण्यासाठी निधी दिला जात नाही. त्यामुळे आमदारांच्या समस्येकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाच राज्यातील निवडणुकांसाठी काँग्रेस सरकार पैसे गोळा करून  काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पाठवत आहे. बेळगाव शहरात आयकर विभागाच्या छापेमारीत काँग्रेस नगरसेवकाच्या घरी पैसे मिळाले. हा सगळा काँग्रेसचा पैसा असल्याचा आरोप माजी आ. बेनके यांनी केला.

तर विधान परिषद सदस्य नवीन यांनी खोटी हमी आणि खोटे आरोप करून कर्नाटकात सत्ता मिळवलेल्या काँग्रेस कंत्राटे आणि बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करत असून आज ते पुराव्यासह पकडले जात आहेत अशी टीका त्यांनी केली.

याप्रसंगी खासदार मंगला अंगडी  यांनी, जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवून सत्ता मिळवलेल्या काँग्रेसचा  खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. नुकत्याच आयकर विभागाने बेळगाव शहरात केलेल्या कारवाई दरम्यान हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे असे त्या म्हणाल्या.

यावेळी भाजपचे सरचिटणीस मुरगेंद्रगौडा पाटील, दादागौडा बिरादार, नगरसेविका विणा विजापुरे वाणी जोशी, गिरीश धोंगडी, भाजप नेत्या विजया हिरेमठ, एफ. एस. सिद्धनगौडा, लीना टोपन्नावर, जयश्री हिरेमठ यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.