•  बेंगळूर पोलिसांची कारवाई

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव येथील हिंडलगा आणि बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृह  उध्वस्त करण्याची धमकी देणाऱ्याला अखेर बेंगळूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.किरण मोशी (वय ४८ रा. ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी कारागृह उत्तर विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांना फोन करून बेळगाव येथील हिंडलगा आणि बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात बॉम्ब हल्ला घडवण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी कारागृह उत्तर विभागाचे डीआयजीपी टी. पी. शेष यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे संशयिताला ताब्यात घेण्यासाठी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी सहकाऱ्यांसह बेंगळूरला रवाना झाले आहेत.

संशयित मोशी याने दुसऱ्याचे अकाउंट हॅक करून त्यावरून अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाने त्याच्यावर कारवाई केली होती. यामुळे २०२२ मध्ये हिंडलगा कारागृहात तो शिक्षा भोगत होता.आता त्याने सरकारी अधिकाऱ्यांचे क्रमांक मिळवून पत्नीच्या नावे असणाऱ्या सीमकार्ड वरून धमकीचा फोन केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे.