• सन २०२४ साली मे महिन्यात होणार यात्रा

सांबरा दि. ११ ऑक्टोबर २०२३ / वाय. पाटील

बेळगाव तालुकाच्या ग्रामीण भागातील सांबरा गावची श्री महालक्ष्मी यात्रा पुढीलवर्षी सन २०२४ साली मे महिन्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सांबरा गावात भक्तिमय वातावरणात गाऱ्हाणे कार्यक्रम संपन्न झाला. या गाऱ्हाणे कार्यक्रमानिमित्त मंगळवारी गावात कडक वार पाळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

प्रारंभी शस्त्रपूजा करण्यात आली. तसेच रथासाठी लागणाऱ्या औदुंबरच्या झाडाचे लाकूड पारंपरिक वाद्याच्या साथीने शेतातून आणण्यात आले. त्या लाकडाची पूजा केल्यानंतर मिरवणुकीने ते लाकूड दुर्गादेवी मंदिरात ठेवण्यात आले. 

प्रमुख मानकऱ्यांनी आणलेल्या कुऱ्हाडीची पूजा आणि  मंदिरासमोर धान्यांची आरास करून मंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर रेडा व पालवा सोडण्याचा विधी झाला.यानंतर श्री महालक्ष्मीच्या जयघोष करून गाऱ्हाणे घालण्यात आले. धनगरी ढोल, हलगी - ताशा आणि कोरवी या पारंपरिक वाद्यांनी कार्यक्रमाची शान वाढविली.