बेळगाव / प्रतिनिधी 

समाजात कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली,तरी पोलीस आपला जीव धोक्यात घालून परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात आणि ती घटना  जनतेसमोर आणण्याचे काम करतात. तेव्हा पोलिसांचे आरोग्य आणि सुरक्षेवर अधिक भर दिला पाहिजे असे मत बेंगळूर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. बेळगाव जिल्ह्याच्या निरीक्षणासाठी आज शुक्रवारी दौऱ्यावर आले असता.पोलिस परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर असताना स्वतःची काळजी न करता समाजाच्या सुरक्षेची काळजी घेत असतात मात्र निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्यावी असे सांगून त्यांनी स्वतःच्या संरक्षणावर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर भर दिला तर निवृत्तीनंतरही आपले जीवन आनंदी होईल असे सांगितले.

तत्पूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हा पोलीस विभागाचे संचलन झाले. जिल्हा पोलीस परेड मैदानावर झालेल्या या संचलनात पोलीस दलाच्या विविध तुकड्यांचे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद संचलनाला कन्नड भाषेत सूचना (कमांड) देत चालना दिली. यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक एम.चंद्रशेखर यांनी संचलनाची पाहणी करून पोलीस विभागाकडून मानवंदना स्वीकारली. 

या पोलीस संचलनामध्ये  जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद, आयजीपी विकास कुमार, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख वेणुगोपाल  यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.