बेळगाव / प्रतिनिधी
स्मार्टसिटी अंतर्गत विकास साधून कॅन्टोन्मेंटकडे हस्तांतरित करण्यात आलेले रेल्वे बसस्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. कॅन्टोन्मेंटने योग्य देखभाल न केल्याने अनेक गैरसोयी निर्माण झाल्या असून प्रवाशांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू ) सेठ यांनी आज सदर बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी परिसरातील नागरिकांनी बस स्थानकावरील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याप्रसंगी परिवहनचे उपविभागीय अधिकारी के.के.लमाणी, कॅन्टोन्मेंटचे सतीश मन्नोळी यांनाही सूचना करण्यात आल्या.
बेळगाव शहरातील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या बस स्थानकावर बससेवेसह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेव्हा येथील स्वच्छता, पथदिप आणि बस वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि रिक्षा संघटनेने केली.
कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष झाल्यामुळे बसस्थानकात कचरा साचला आहे. तर पथदीपही बंद अवस्थेत आहेत. परिणामी अनेक गैरसोयी निर्माण झाल्याने प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बसस्थानक परिवहनकडे हस्तांतरित करावे,तसेच परिवहन आणि कॅन्टोन्मेंटने परस्पर समन्वयातून समस्यांचे निवारण करावे, विशेषतः परिवहनकडून या ठिकाणी बस पाठविल्या जात नसल्याने प्रवाशांचे हेलपाटे होवू लागले आहेत. बसेस गोगटे आहे सर्कलमार्गे परस्पर जात असल्याने बसस्थानकातील प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे. त्यामुळे परिवहनने दक्षिण भागात धावणाऱ्या सर्व बस या बसस्थानकामध्ये पाठवाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे.
- ऑटोरिक्षा चालक - मालक संघटनेचे आ.आसिफ (राजू) सेठ यांना निवेदन
रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणादरम्यान रिक्षा बस स्थानक कंपाऊंडच्या बाहेर उभ्या करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता काम पूर्ण झाल्यानंतर इतर वाहनांप्रमाणे ऑटो रिक्षाही बसस्थानक कंपाऊंडच्या आतमध्ये उभ्या करण्यास परवानगी द्यावी अशी ऑटोरिक्षा चालक - मालक संघटनेची मागणी आहे. आज उपरोक्त मागणीचे निवेदन ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेने आ.आसिफ (राजू) सेठ यांना सादर केले आहे.
0 Comments