• आ.अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापौरांनी घेतली राज्यपालांची भेट
  • महापालिकेतील वादाबाबत सादर केले तक्रारींचे निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी

करवाढीच्या ठरावात बेकायदा दुरुस्ती, महापौरांच्या सहीची फाईल गहाळ होणे आदि कारणावरून बेळगाव महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी गटात संघर्ष निर्माण झाला आहे. हा संघर्ष आता थेट बेंगळूरच्या राजभवनात पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर शोभा सोमनाचे यांनी आज शुक्रवारी संध्याकाळी सत्ताधारी नगरसेवकांच्या शिष्टमंडळासह आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन महापालिकेत निर्माण झालेल्या संघर्षाबाबत तक्रारीचे निवेदन सादर केले.

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या या भेटीप्रसंगी राज्यपालांनी निवेदन स्वीकारून नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी जाणून घेतल्या तसेच त्या संदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.

महापालिकेच्या कारभारात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा  हस्तक्षेप, महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तसेच महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या संदर्भात राज्यपालांच्या भेटीप्रसंगी तक्रार करण्यात आल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

या भेटीवेळी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार ॲड.अनिल बेनके, महांतेश कवटगीमट यांच्यासह  सत्ताधारी गटातील नगरसेवक उपस्थित होते.